पुण्यात कर्वेनगर परिसरातल्या वस्तीत राहणारी मुलंमुली. त्यांच्या शाळाशिक्षणासाठी पालकांना वेळ नसतो. जरुरीच्या गोष्टी आणायला पैसा नसतो. आनंदाचं, शिकण्याचं वातावरण त्यांना मिळतंच असं नाही. आसपास दारू- भांडणं- मारामार्या-शिवीगाळ-जुगार- टगेगिरी यासारख्या गोष्टींनी भरलेलं जग. या मुलांसाठी खेळ, कला, शिक्षण आणि संवादाची ही जागा. इथं त्यांना शिकण्यातला आनंद कळतो, क्षमता,जाणिवांचा विकास साधता येतो आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचीही ओळख होते.
मुलांच्या सभोवताली कसं वातावरण आहे? ती सुरक्षित आहेत का? आनंदात आहेत का? जिथे मुलांचं बाल्य हरपतंय - कोमेजतंय तिथे त्यांना मदतीचा हात देणं आपलं काम आहे. मुलांनी आनंदानं शिकावं, मोठं व्हावं यासाठी त्यांना सुयोग्य वातावरण मिळावं हा खेळघराचा हेतू आहे.
आमचं एक स्वप्न आहे....
अशी एक जागा असावी -
जिथे लहान-मोठे, मुलं-मुली, गरीब-श्रीमंत
सगळेजण एकत्र येतील - आनंदाने शिकतील.
जिथं दडपणं ताण नसतील,
जिथे नसेल अपमान आणि मिंधेपणा
कुणी कुणाला घाबरत नसेल.
कुणी कुणाला तुच्छ लेखत नसेल,
इथे माणूस, माणसाशी-माणसासारखा वागत असेल.
इथे असतील पुस्तकं, खेळ, साधनं नि माणसं...
असेल साथ प्रत्येकाला...
स्वतःला शोधण्यासाठी... काही करून पाहण्यासाठी.
पण नसेल आग्रह नि अट्टाहास कशाचाच,
ज्याला तिला, ज्याच्या तिच्या पद्धतीनं गतीनं,
काम करण्याची मुभा असेल
शिकण्याची इच्छा बहरेल, कष्टाची उर्मी उभरेल,
असं वातावरण असेल.
मुलांना शिकण्यातला आनंद समजणं
सरकारी शाळांमधल्या नीरस नि दडपणुकीच्या वातावरणामुळे वस्तीतील मुलांचा अभ्यासातला रस कमी होतो. खेळघरात खेळ, संवाद, कला या माध्यमांतून मुलांना रोजच्या अनुभवांकडून अभिव्यक्तीकडे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मुलांचं शिकणं आनंदाचं व्हावं, खेळघरात समजुतीचं, मैत्रीचं वातावरण टिकावं यासाठी विचार आणि प्रयत्न आम्ही महत्त्वाचे मानतो.
क्षमतांचा विकास
ऐकणं, पाहाणं, चव घेणं, स्पर्श करणं, विचार करणं या माणसाला उपजत प्राप्त झालेल्या संवेदना. त्यांचा वापर करून त्यानं वाचणं, लिहिणं, बोलणं, निरीक्षण करणं, विचार करणं, अंदाज करणं, विश्लेषण करणं आणि निर्णय घेणं, इ. अनेक क्षमता प्राप्त केल्या. विचारांच्या नि प्रयत्नांच्या मदतीनं या क्षमतांचा विकास होऊ शकतो. शिकण्यातला आनंद समजलेलं मूल या क्षमतांमधे तल्लख होण्याचा आपणहून प्रयत्न करतं. हे जाणून खेळघरात मुलां-मुलींना त्यासाठी पूरक संधी मिळाव्यात यासाठी आवर्जून प्रयत्न केले जातात.
जाणिवांचा विकास
क्षमतांच्या विकासामुळे मुलांचं परिस्थितीचं, त्यातल्या भल्या-वाईट गोष्टींचं आकलन वाढतं, विचार समृद्ध होऊ शकतो.
पण त्यासाठी स्वत:च्या भावना ओळखणं व त्यांचा सुयोग्य दिशेनं वापर करणं जमायला हवं. घडणार्याभ घटना, त्याबद्दल स्वत:च्या तसंच इतरांच्या भावना आणि त्यावर सर्व बाजूंनी विचार यातून जाणिवा विकसित होतात. कुमारवयीन मुला-मुलींच्या जाणिवांच्या विकासासाठी प्रयत्न करणे खेळघराला महत्त्वाचे वाटते.
सामाजिक बांधिलकी
परिस्थिती आणि प्रश्नांसंदर्भातली जाणीव, जागृती सकारात्मक बदलांसाठी कार्यप्रवण व्हायला हवी. त्यासाठी एकत्र येऊन काम व्हायला हवं. ‘माझं ज्ञान, क्षमता, पैसा या मला समाजाकडून मिळाल्या आहेत त्यामुळे त्या फक्त माझ्या वैयक्तिक मालकीच्या नाहीत तर सर्व समाजाचा त्यावर हक्क आहे. त्यामुळे मी, माझं कुटुंब या पलीकडच्या समाजासाठीही काही करायला हवं’, हे भान मुलांमधे विकसित होणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं.
खेळघरागची नीतिमूल्ये