एप्रिल २०११

Magazine Cover

पालकनीतीच्या खेळघरात मुलं चित्रं, शिल्प, चिकटकाम, घडीकाम, कातरकाम अशा वेगवेगळ्या माध्यमांचा मनसोक्त वापर करतात. गेल्या वर्षभरात पालकनीतीतल्या ‘कलेतून शिक्षण’ या लेखमालेमुळे तर नवनवीन कल्पनांचा खजिनाच तायांच्या हाती लागला. एके दिवशी सहावी-सातवीतल्या मुलांनी सुचवलं, ‘आपण खेळघराच्या गच्चीवर घर बांधूया.’ आमच्या पोटात गोळाच आला कारण आम्हाला कुठे माहीत होतं घर कसं बांधायचं ते ! पण खेळघरातल्या बहुसंख्य मुलांचे आई-वडील बांधकाम कामगार आहेत. त्यांची घरं सार्‍या कुटुंबानं मिळूनच बांधलेली आहेत. त्यामुळे घर बांधणं या मुलांसाठी मातृभाषेसारखं सहज. परिसरातनं मुलं भलं-बुरं बरंच काही शिकतात पण त्यातल्या भल्याला बढावा देण्याचं काम खेळघराचं !
मुलं उत्साहानं कामाला लागली. कुठून कुठून विटा, कॉंक्रीटचे ब्लॉक्स, माती जमा व्हायला लागली. घर बांधायला थापी, घमेली सगळं मुलांनी घरूनच आणलं. २-३ दिवसात भराभर घर उभं राहिलं. झावळ्यांचं छत बनलं. शेणामातीचं प्लॅस्टर झालं. खेळघरात शिकलेल्या वारली चित्रांनी सजलं. घराला पडदा लागला. कुंड्या-रांगोळीचं सुशोभन झालं. मुलांनी स्वतः बांधलेलं त्यांचं स्वतःचं घर तयार झालं. ४' X ५' चं छोटंसं घर पण त्यात बसून गप्पा मारायला, शिकायला मुलांना विशेष आवडतं. या घरात तुमचं स्वागत !

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...