आमचा आगळा वेगळा किल्ला
या वर्षी लक्ष्मीनगरच्या वस्तीतील नवीन जागा खेळघराने घेतली. त्या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगर उताराचाच काही भाग ह्या घरात आला आहे. तो भाग थोडा किल्ल्यासारखाच दिसतो. दिवाळीसाठी येथेच किल्ला करूयात. असे मुलांनी ठरवले. बाहेरून आणखी माती, दगड न आणता कागद, नैसर्गिक रंग, टाकाऊतून टिकाऊ गोष्टी वापरून किल्ला करायचे ठरवले. ‘किल्ल्याच्या पायथ्याशी गाव वसवूया, बाहेर आलेल्या भिंतीवर दाट जंगल दाखवूया, वरती किल्ल्याचे बुरूज बनवून शिवाजी महाराजांची मूर्ती तिथे ठेवूया. गावात नदीही हवीच’ अशा कल्पना मनात धरून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कोणी भिंतीला रंग दिला, तर कोणी ओरिगामीची फुले, पाने बनवली. कागदाचे ढग बनवण्यात आले, नदीत होड्या, हंस सोडण्याची तयारीही झाली. काही मुलांनी किल्ल्याचे बुरूज बनवले तर काहींनी फुलांची शेती, घरे, कोलाजची झाडे बनवली. शेवटी मावळे मांडून किल्ला तयार झाला.
सर्वांनीच काळवेळेचे भान विसरून काम केले. प्रत्येकाच्या कल्पनेला वाव मिळाला, प्रत्येकाला नवीन काहीतरी शिकायला मिळाले. ‘पण मुलींनीही आमच्याबरोबर यायला हवे फक्त फराळात अडकू नये’ असेही मुलांनी सुचवले. ही तयार झालेली कलाकृती कायमस्वरूपी तशीच ठेवून त्यात नवीन नवीन गोष्टींची भर घालत राहूया असे सर्वांनी मिळून ठरवले. आपल्याला आमचा किल्ला बघायला येण्याचे हार्दिक आमंत्रण !
स्मिता वारघडे