मुखपृष्ठाबद्दल - छोट्याला उचलून घेणार्या मोठ्याचं असं त्रिमित चित्र आपणही सहज करू शकाल. ही रचना कमलाकर पोतदार यांची आहे. चित्राची कृती arvindguptatoys.com वरून साभार.
नव्या वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.
या नव्या वर्षाच्या निमित्तानं वाचकांना एक विनंती करायची आहे, एक संकल्प सुचवायचा आहे. मनातून आपल्याला मान्य असलेला, तरीही धकाधकीच्या जीवनात विसरून मागे राहून जाणारा असा एक मुद्दा या निमित्तानं आपल्या समोर आणत आहोत. आपण जगतो त्या जगात अनेक अपंग माणसंही जगतात, आणि त्यांची किमान काळजी घेणं ही आपली सामाजिक जबाबदारीच आहे. आपल्याकडे अजूनही ह्यासारख्या मुद्यावर आवश्यक तेवढी संवेदनशीलता आलेली नाही, हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. २०१२ ह्या वर्षात तरी आपण त्यात बदल करूया. इतर देशांमधे-पाश्चिकमात्य राष्ट्रांमधे इतर अनेक प्रश्नत असले तरीही ही बाब मात्र आपल्या मानानं बर्या्च वरचढ क्षमतेनं त्यांना साधलेली आहे. आपल्याला न साधण्यासारखं त्यात फारसं काही नाही, हा बदल मुख्य म्हणजे आपल्या दृष्टीत व्हायला हवा आहे, तसाच आपल्या अग्रक्रमांबद्दलच्या संकल्पनेतही. कसं होतं बघा.
एका नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये दोन आठवड्यांच्या लहानशा अभ्यासक्रमासाठी, पायातल्या स्नायूत शक्ती नसलेल्या एका मुलीला प्रवेश हवा होता. तिची बहीण तिला घेऊन येणार होती, तिला मदत करणार होती आणि त्या निमित्तानं स्वत:ही तो अभ्यासक्रम करणार होती. या दोघींनी एकच विनंती आयोजकांना अगदी गाठून केलेली होती, की वर्ग खालच्या मजल्यावर घ्यावा. या त्यांच्या विनंतीकडे आयोजकांनी पूर्ण दुर्लक्ष केलंंं. पहिला आठवडा तसाच संपला. त्या वर्गातल्या इतरांना बहिणीची रोज जिना चढता-उतरताना होणारी परवड जाणवली आणि त्यांनी आयोजकांना पुन्हा विनंती केली, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, ‘‘आता निम्मा कोर्स तर झालाच आहे, कुठे एका आठवड्यासाठी बदलाबदली करायला सांगताय?’’ हे उत्तर आणि ही अनास्था आपल्याकडे सर्वत्र पहायला मिळणारी आहे.
त्यावेळी बदलाचा आग्रह धरला गेला नसता तर उरलेले सर्व दिवसही तिला बहिणीच्या पाठुंगळी बसूनच दोन मजले चढून यावं लागलं असतं. अपंग व्यक्तींबद्दल, विशेष गरजा असणार्यांबद्दल एवढी निर्घृण असंवेदनशीलता आपल्या समाजात का?
व्यक्तिगत आणि व्यवस्थात्मक अशा दोन पातळ्यांवर या मुद्यांकडे पहायला हवं. या प्रश्नांकडे आपण एक व्यक्ती म्हणून कसे पाहतो? हे प्रश्न आपण ‘त्या गटातले’ नसलो तर आपल्याला जाणवतात का? भिडतात का? त्याच्या सोडवणुकीसाठी आपण काही पावलं उचलतो का? इथे उल्लेखलेलं उदाहरण घेतलं तर संबंधित मुलीचा प्रश्न त्या वर्गातील इतर तीस जणा-जणींना, शिवाय त्या शैक्षणिक संस्थेतल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांउना पहिल्या दिवसापासूनच दिसत होताच की. तरीही त्याच्या सोडवणुकीसाठी ताबडतोबीनं प्रयत्न केले गेले नाहीत. ‘मला काय त्याचं, माझा काय संबंध, मी काय करू शकणार’ असा असमंजस, कोरडा दृष्टिकोन त्यामागं असणार. एका अर्थी वर्गाची खोली बदलणं हा तात्पुरता असला तरी व्यवस्थात्मक बदल आहे. पण व्यक्तिगत पातळीवरची निष्क्रियता आणि असंवेदनशीलताच ह्या व्यवस्थात्मक उदासीनतेला जन्म देते. गंमत म्हणजे जेव्हा आग्रह धरला, मुद्दा अगदी लावूनच धरला, तेव्हा कुठे वर्ग खाली आणायला संबंधित लोक तयार झाले. हलवाहलवीसाठीच्या मदतीला वर्गबंधू आणि भगिनीही आल्या. मागं लागलं तर घडतं, घडवून आणता येतं, पण इतका सहज पटण्याजोगा मुद्दा समजून घ्यायला, प्रत्यक्षात आणायला मागं लागावं का लागतं असा खरा प्रश्न् आहे.
दुसरा मुद्दा व्यवस्थात्मक तरतुदींचाही आहे. विशेष गरजा असणार्यां च्या मूलभूत अधिकारांचं जतन व्हावं, ते अधिकार त्यांना उपभोगता यावेत म्हणून ‘समान’ संधीसाठी ‘विशेष’ संधीचं तत्त्व भारतीय राज्यघटनेनं मांडलेलं आहे. या तत्त्वाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशा प्रकारे होते? याचं एक उदाहरण वर दिलेलं आहे, तशी याची अनंत उदाहरणं आपल्याला सगळीकडेच दिसतात. अपंगांसाठी असलेल्या राखीव जागा भरल्या जात नाहीत हेही आपल्याला माहीत असतं तरीही आपलं ह्याकडे लक्ष जात नाही. सार्वजनिक जीवनात मोकळेपणानं वावरण्याची, स्वतःतल्या सर्व क्षमता फुलवण्याची संधी अपंगांना आपल्या समाजात मिळते का, तशी संधी आपल्याला आहे ह्याची जाणीव सामाजिक जीवनात त्यांना असते का, ह्या प्रश्नां चं उत्तर ‘नाही’ असं आहे. आणि ही आपल्या समाजाला न शोभणारी बाब आहे. मल्टीप्लेक्स सिनेमागृहे आणि पंचतारांकित हॉटेलांमधे लिफ्ट्स, व्हील चेअर नेता येईल असा मार्ग असतो, पण शैक्षणिक संस्थांमधे वर्ग वरच्या मजल्यावर असणं, लिफ्टची सोय नसणं, व्हीलचेअर न्यायला वाट नसणं अशा म्हटलं तर साध्या वाटणार्या् बाबी, त्याबद्दल कुठलीही समज नसल्यासारख्या सरसहा दिसतात. समाजात, सार्वजनिक ठिकाणी कुणाही वेगळ्यानं सक्षम असणार्या व्यक्तीला सहजसुलभ वावरता येईल अशा सोई-सुविधा आपल्याकडे क्वचितच का दिसतात? सगळीकडे का नसतात? केवळ तेवढं उपलब्ध करून दिल्यानंही जीवनातल्या अनेक अवकाशांची कवाडं त्यांच्यासाठी खुली होतील.
या तुलनेत परेदशातील-पाश्चिमात्य देशातील सर्वसमावेशक रचना, अपंगस्नेही व्यवस्था पाहून बरं वाटतं. त्या त्यांच्या व्यवस्थेचा सहज - अविभाज्य भाग म्हणूनच येतात मग ते व्हील चेअरसाठीचे खास रस्ते असोत वा सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील स्वच्छतागृहांची विशिष्ट रचना असो, ऑफिसमध्ये काम स्वीकारताना काही विशिष्ट गरजा सांगितल्या गेल्या तर त्याची जबाबदारी स्वीकारून व्यवस्थापन तशा सोयी उपलब्ध करून देतं, उदा. विशिष्ट प्रकारची खुर्ची किंवा बोटांच्या वेगळ्या रचनेशी सोईस्कर असा की बोर्ड असेल वा दृष्टी अधू असलेल्या व्यक्तीसाठी ऑफिसमध्ये भिंगाचा स्क्रीन उपलब्ध करून देणं असेल. हे आता आपल्या देशातही घडायला हवं, ते करताना उपकाराचा, कणवेचा दृष्टिकोन यात अजिबात असता कामा नये. हक्काधारित सार्वजनिक जबाबदारीचीच जाणीव अगदी सहजपणानं यातून व्यक्त व्हायला हवी.
आपल्याकडे आणखी एक अडचण दिसते. सांगितलं तर स्वीकाराआधी उलटे प्रश्नच विचारण्याची. बाकी अनंत ठिकाणी परदेशी रीतीपद्धतीची अगदी आंधळी नक्कल होताना दिसत असते, पण अशी उदाहरणं सांगितली की लगेच उलटा प्रश्न केला जातो - ‘त्यांच्याकडे सगळं ठीकय. त्यांच्याकडे सुबत्ता किती आहे. पैशाचा प्रश्न नाही आणि संसाधनांचीही कमी नाही. आपला देश गरीब, एवढा मोठा, इथं धडधाकट माणसाला मूलभूत सेवासुविधा मिळताना मारामार. तर अपंग, विशेष गरजा असणार्यां कडं कोण बघणार?’
प्रश्न फक्त संसाधनांचा, संपन्नतेचा आहे की प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा? आपण आपले स्वतःचे हक्क जितके महत्त्वाचे मानतो तितकेच दुसर्यासचेही हक्क महत्त्वाचे आहेत असं मानतो का? आहेत त्या संसाधनांच्या समन्याय वाटपाचा आग्रह धरतो का? त्यासाठी प्रसंगी स्वतःला थोडा कमी फायदा झाला तरी चालेल असं म्हणतो का? एकादोघांनी पुढं पुढंच धावण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन धावू - वेग मंदावला तरी चालेल, या संकल्पनेचा स्वीकार आपण करतो का? असे अनेक प्रश्न या प्रश्नाच्या पोटात दडलेले आहेत. या नव्या वर्षी आपण या आणि यासारख्या प्रश्नांचकडे थोडं अधिक लक्ष पुरवू.
मुलं संवेदनशील व्हायला हवी असतील (खरं तर मुलं संवेदनशीलच असतात, मोठ्यांचं जे जग पाहत पाहत, अनुभवत ती मोठी होतात तेव्हा त्यांची संवेदनशीलता बोथट होत जाते) तर त्यांच्या आजूबाजूचं जग संवेदनशील असायला हवं. ही संवेदनशील जाणीव - केवळ अपंगांविषयीच नाही तर सर्व प्रकारच्या वंचितांविषयी असायला हवी. यात सहृदयतेनं बोलणं - वागणं यापासून त्यांच्या विशेष अधिकारांविषयी जागरूक असणं इथपर्यंत सगळ्या गोष्टी येतील. कधी रस्त्यावरून हातगाडी ओढणार्यास जख्ख म्हातारीला मदत करणं असेल तर कधी शाळेतल्या अपंग मुलासाठी खास वेगळ्या प्रकारच्या शर्यतीचं आयोजन असेल. किंवा कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट सोयीचा आग्रह धरणं असेल. थोडक्यात म्हणजे, मी - माझं - माझ्यापुरतं अशा संकुचित वृत्तीतून बाहेर येत ‘आपलं’ सगळ्यांचं जग बघायची दृष्टी अंगिकारणं मोठ्यांनी केलं तरच मुलांमधला माणुसकीचा झरा टिकून राहील. वंचितांविषयीची जाणीव आपल्या मुलांच्या उक्तीकृतीतून सहजपणे झिरपताना दिसायला हवी असेल तर त्यासाठी प्रयत्न मात्र आवर्जून करावे लागतील.
मुलं, पालक, शिक्षक सर्वांना आपलंसं वाटणारं पुस्तक म्हणून तोत्तोचानचा खूप प्रेमानं उल्लेख केला जातो. त्यात तर ताकाहाशी नावाच्या काहीशा अपंग मुलाच्या मनात स्वतःच्या अपंग शरीराबद्दलचा कुठलाही न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना कधीच निर्माण होऊ नये, यासाठी तोच पहिला येईल अशा प्रकारच्या खेळांची आखणी केल्याचं वर्णन आहे. मुद्दाम अशा खेळांची योजना केलेली नसतानाही अनेक ठिकाणी वेगळ्यानं सक्षम असणारी मुलंमुली वरचढ ठरतात, लखलखतात, त्यांचं कौतुक अनेकदा माध्यमांमधून आपल्या समोर येतं; पण त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी आपण सहजपणे तयार असायला हवं हे मात्र त्यातून येत नाही. आपण सर्वांनी ठरवलं तर निदान आपल्या प्रत्येकाच्या संदर्भात तरी हा फरक घडेल.
‘खेळा’ला आपला आपला असा अर्थ असतो. अनेक सूक्ष्म अर्थच्छटांनी हा शब्द वापरला जातो. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र यापासून ते सध्याच्या व्यवस्थापन शास्त्रापर्यंत वेगवेगळ्या अशा सर्व ज्ञानशाखांमध्ये ‘खेळ’ हा शब्द अगदी परस्पर भिन्न अर्थांनी वापरला जातो. त्यामुळे या अंकाचा विषय म्हणून या शब्दाचा नेमका कोणता अर्थ घेतला असेल याबाबत कुतूहल होतं. ढोबळमानानं खेळाचे दोन प्रकार करता येतील. ज्यात जिंकणं-हरणं हा अविभाज्य भाग आहे असा स्पर्धात्मक अंगाचा खेळ आणि दुसरा, मुलांच्या नैसर्गिक वाढीविकासाचं अंग असलेला, ज्यात स्पर्धा नाही असा खेळ. पहिल्या प्रकारच्या खेळाचा उगम हा आदिम काळात टोळीयुद्ध होत असत त्यामधून झालेला आहे, असं मानलं जातं. याचं विवेचन न-वास्तव खेळांबाबतच्या लेखात थोडक्यात आलेलं आहे.
मात्र या अंकाचा मुख्य विषय मुलांच्या नैसर्गिक विकासाचं अंग असलेला स्पर्धाविहीन खेळ हाच आहे. गुणात्मकदृष्ट्या या दोन्ही प्रकारच्या खेळात, त्यांच्या अर्थांमध्ये खूप फरक आहे. पहिल्या प्रकारच्या खेळात स्पर्धा, जिंकणं, आपण जिंकलं पाहिजे या भावनेचं तुष्टीकरण होणं हा खेळाचा हेतू आहे. तर दुसर्यां प्रकारच्या खेळात स्पर्धेला जरासुद्धा वाव नाही. अगदी सहजपणे, नैसर्गिकपणे मुलांमध्ये असलेल्या क्रियाशीलतेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणून हा खेळ येतो. तो स्पर्धेपासून इतका दूर आहे की त्याचे नियमसुद्धा मुलं स्वत:च ठरवतात - कधी एकटी तर कधी गटात - कधी त्यांचे नियम बदलतातही. त्यामुळे तो गुणात्मकदृष्ट्या वेगळा ठरतो.
आपल्या समाजात मुलांच्या खेळाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. आपल्या भाषेत जे वाक्प्रचार बनतात त्यातून आपली दृष्टी प्रतीत होत असते. उदा. एखाद्या गोष्टीत अर्थ
उरलेला नसेल तरी आपण त्याला ‘नुसता पोरखेळ चाललाय’ असं म्हणतो. प्रत्यक्षाच्या पातळीवर तर खेळणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे असं बर्या्च जणांचं म्हणणं असतं. त्यामुळे अशा प्रकारचा समज समाजामधे दृढ आणि लोकप्रिय असताना ‘खेळ’ विषयावरचा एक वेगळा अंक पालकनीतीनं सादर केलाय याचं फार महत्त्व आहे असं मला वाटतं.
अंकाच्या सुरुवातीला प्रियंवदा बारभाईंचा प्रदीर्घ लेख आहे. पियाजे, वायगॉटस्कीसारख्या मानसशास्त्रज्ञांपासून नोम चॉम्स्कीसारख्या आजच्या काळातल्या भाषाशास्त्रज्ञापर्यंतच्या विचारांचा आढावा यात घेतलेला आहे. यातल्या प्रत्येकानं खेळाबद्दल थेटपणे काही म्हटलेलं नाहीये. पण खेळ आणि शिक्षण यांचं जे नातं या अंकात उलगडून दाखवलेलं आहे, त्यासाठीची एक विस्तृत पार्श्वभूमी या लेखामुळे तयार होते.
आपलं ज्ञान बांधण्याची, आपल्या संकल्पना विकसित करण्याची प्रक्रिया कशी घडते हे पियाजे उलगडून दाखवतो. एक वेगळी दृष्टी घेऊन मुलांच्या खेळाकडे बघणारं हे काम पाश्चात्य जगतामध्ये झालंय पण अशा या दिग्गजांच्या मौलिक विचारांचा परिचय अजूनही आपल्या शिक्षकांना नाही. म्हणूनच हे मराठीतून आणण्याचं काम मला महत्त्वाचं वाटतं.
वायगॉटस्कीच्या लेखाचा स्वैर अनुवाद ‘संशोधकांच्या चष्म्यातून’ या विभागात दिलेला आहे. वायगॉटस्कीबद्दल महाराष्ट्र बालशिक्षण मंडळानं प्रसिद्ध केलेली एक छोटी पुस्तिका सोडल्यास मराठीतून त्याचं दुसरं काहीही साहित्य उपलब्ध नाही. म्हणूनच मला असं वाटतं की शिक्षक - प्रशिक्षक कार्यक्रम, डी. एड्. महाविद्यालयं या ठिकाणी आवर्जून हा अंक दिला जावा.
खेळाकडे बघण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा विस्तृत आढावा अंकामध्ये वाचायला मिळतो.
अगदी लहान मूल स्वत:शी खेळत, वास्तव जगाला प्रतिसाद देत, त्या क्षणामध्ये जगत असतं. पुढे त्यातल्या खेळाचा आधार घेऊन कल्पनेच्या जगातून हळूहळू अमूर्त विचारांच्या पातळीवर कसं जातं याची अत्यंत घट्ट, विश्ले षणात्मक अशी मांडणी वायगॉटस्कीनं केलेली आहे. या अंकात वायगॉटस्कीच्या लेखाचा सारांश दिला आहे पण मूळ लेखाचा जसा आहे तसाच्या तसा अनुवादही पालकनीतीनं करायला हरकत नाही.
आणखी एक महत्त्वाचा लेख म्हणजे जोन एरिक्सनचा लेख. सर्जनशीलता आणि खेळाचा असलेला घनिष्ट संबंध यात उलगडून दाखवलेला आहे. एखादी गोष्ट सर्जनशीलतेनं करत असताना आपले पूर्वग्रह त्यामध्ये आणून चालत नाहीत; मोकळेपणानं विचार करता आला पाहिजे असं जोन म्हणते. मूल स्वत:चं स्वत: खेळत असतं, किंवा स्वत: नियम बनवून इतर मुलांबरोबर खेळत असतं तेव्हा हा मोकळेपणा दिसून येतो. उदाहरणार्थ मूल काठी घेतं आणि त्याचा घोडा घोडा करतं. काठीला घोडा म्हणणं तार्किकदृष्ट्या आपल्याला खटकेल. पण काठीला घोडा मानायचं आणि आपली कल्पना पुढे बांधत जायची, अशा तर्हेठचा एक मोकळा विचार त्यामागे आहे. हा मोकळा विचार सर्जनशीलतेच्या पोटात तयार होतो. म्हणूनच सर्जनशीलता असायला हवी असेल तर मुक्तता हवी, पूर्वग्रह नकोत आणि ते खेळातून साध्य होतं अशी मांडणी या लेखातून पुढे येते.
या विभागात बरीच तात्त्विक चर्चा आहे. त्यामुळे एकेक लेख काही दिवसांनी पुन्हा वाचला तर अधिक चांगला समजायला मदत होईल असं मला वाटतं.
यानंतरच्या ‘प्रत्यक्षाच्या अंगणातील’ या विभागातल्या लेखकांच्या नावावर नजर टाकली तर लक्षात येतं की ही सर्व मंडळी जे आपण सुरुवातीच्या लेखांमध्ये वाचतो आहोत ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणारी, त्यासाठी आटापिटा करणारी आहेत. सुचिता पडळकर, मंजिरी निमकर, सुषमा शर्मा या सर्वांनी वर्षानुवर्षं अत्यंत विचारपूर्वक शिक्षणाचं काम केलेलं आहे. शिक्षणाचं काम करणार्यांंना महाराष्ट्रात तोटा नाही. शिक्षण-सम्राटही भरपूर आहेत. परंतु त्या कामामध्ये विचार असतो का? जे आपण तत्त्वात शिकतोय ते प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून मी काम करतो का? असे जर प्रश्न विचारले तर अशी कामं मोजायला खरोखरच हाताची दहा बोटंसुद्धा लागणार नाहीत. अशा मंडळींनी हे लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे आधीच्या विभागातली तात्त्विक चर्चा वाचताना आपल्याला जी धाप लागते ती अगदी सहजपणे या पुढच्या लेखांमधून उलगडते. कारण तिथं प्रत्यक्षातली भरपूर उदाहरणं आहेत. या सगळ्या मंडळींचा भक्कम अनुभव या लेखांच्या पाठीमागं आहे. त्यामुळे आधी वाचलेल्या ज्या तात्त्विक गोष्टी आहेत त्यांचे नवेनवे अर्थ, अधिक नेमके अर्थ आपल्याला उलगडायला लागतात.
नीलिमा गोखलेंनी त्यांच्या लेखात एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय - ‘मुलं जेव्हा खेळत असतात त्यावेळेला शिक्षकाची भूमिका काय असायला हवी’, हा. बहुधा मोठी माणसं-शिक्षक, पालक यांच्यामुळेच खेळाचं नुकसान होतं असा अनुभव येतो. त्यामुळे मोठ्यांची भूमिका काय असायला हवी याचं विवेचन लक्षात ठेवणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक मुद्दा त्यांनी मांडलाय की मुलं जे खेळतात त्याचं आपण निरीक्षण करायला पाहिजे, त्याच्या आपण नोंदी ठेवायला पाहिजेत. आपल्याला गंमत वाटेल पण पियाजेसारख्या दिग्गज मानसशास्त्रज्ञाचं संशोधन हे त्यानं त्याच्या स्वत:च्या मुलाच्या केलेल्या निरीक्षणाच्या नोंदीतनं सुरू झालेलं होतं.
आपल्या समाजामध्ये इतका नीटसपणा आणि जोश, दम टिकणं जरा कठीणच असल्याचं दिसतं. पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की मुलं काय खेळतात, काय करतात याच्या तपशीलवार नोंदी जर असतील तर आपली एक दृष्टी तयार व्हायला मदत होते. या लेखांमधल्या नोंदी तुम्ही जरूर वाचाव्यात. त्या नोंदी निश्चितच त्यांच्या शाळांमध्ये केल्या गेलेल्या आहेत. एखाद्या शाळेमध्ये एका मुलाच्या किती बारकाव्यांकडे लक्ष दिलं जातं. त्या बारकाव्यांचे कसे अर्थ लावले जातात, त्यातलं नेमकं शिक्षकाला काय कळतं हे घेण्यासारखं आहे. प्रत्यक्ष काम करणार्या व्यक्तींनी, आपलं काम सैद्धांतिक प्रकाशामधे पाहणं, तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात पाहणं, पुन्हा पुन्हा तपासून पाहणं, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं आणि ही सगळी मंडळी असं करणारी आहेत. म्हणून हे लेख महत्त्वाचे आहेत. हे लेख अत्यंत सहज भाषेत लिहिलेले आहेत, रसाळ आहेत; पण त्यातला मुद्दा गंभीर आहे.
काही वर्षांपूर्वी मला गुजराथमध्ये गिजुभाई बधेकांची शाळा बघायला जाण्याचा योग आला. तिथे एक मोकळी खोली होती. त्या खोलीच्या दरवाज्याला भोकं करून ठेवलेली होती; का तर आतमध्ये वेगवेगळं साहित्य घेऊन मुलांना खेळायला सोडायचं, दरवाजा बंद करून बाहेर शिक्षकानं निरीक्षण करत बसायचं त्या भोकांमधून. जे बघितलं ते मग लिहून काढायचं. गुजराथीमधून लिहिलेल्या चाळीस-चाळीस पानांच्या नोंदी मला तिथं पहायला मिळाल्या. अशा तर्हेाचा अभ्यास करण्याचा आपल्याकडेही प्रयत्न झालेला होता ही माझ्यासाठी अगदी नवी गोष्ट होती. दुर्दैवानं अभ्यास या रूपानं तो आपल्यापुढे कधी आला नाही. त्यामुळे या अंकातल्या प्रत्यक्ष काम करणार्यात मंडळींनी लिहिलेल्या लेखांमध्ये प्रचंड ताकद आहे असं मला वाटतं. भारतीय परिस्थितीमध्ये मुलांचं वाढणं कसं असतं, मुलांचा विकास कसा होत असतो याचा अंदाज या लेखांतून येतो. अभ्यासक्रम ठरवताना किंवा प्रशिक्षण साहित्य निर्मितीसाठी याचा उपयोग होऊ शकतो.
हा अंक खेळावरचा आहे. आणि तो अरविंद गुप्ता आणि त्यांच्या कामावर आधारित लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या लेखातून मांडलेला एक महत्त्वाचा प्रश्न असा की - जेव्हा गुप्ता मुलांना खेळणी शिकवतात, तेव्हा त्यामागची तत्वं ते का समजावून सांगत नाहीत? असं का, हे त्यांना अनेक वेळा विचारलं गेलं आहे. त्याच्यावरचं उत्तर त्यांनी या मुलाखतीमधून दिलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर हे आज ज्याला आपण ज्ञानरचनावाद म्हणतो त्याच्या मुळाशी जाणारं आहे. मुलांनी मुलांचं ज्ञान स्वत: निर्माण करायचं म्हणजे नेमकं कसं - या प्रश्नाच्या मुळाशी असलेला हा विचार आहे. नितांत सुंदर असा हा लेख व मुलाखत आहे. ती जरूरच वाचावी.
खेळ आणि शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध आहे. खेळ कुठे संपला आणि शिक्षण कुठे सुरू झालं हे ठरवता येणं अनेकदा कठीण असतं. तरी देखील प्रत्यक्ष शाळेमध्ये आपल्याला जे शिक्षण मिळतं ते आणि खेळ हे वेगळे आहेत, हे आपल्याला कुठंतरी जाणवत असतं. बर्याआच वेळेला खेळ संपून शिक्षण सुरू होतं अशा तर्हेाची मांडणी आपोआपच आपल्या मनामध्ये तयार होते. हा पूर्वग्रह या अंकामुळे दूर होईल. खेळाची प्रक्रियाच अशी आहे की ती मुळात शिकण्याचीच प्रक्रिया आहे. शिक्षण प्रक्रियेचा एक अभिन्न भाग म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे हा मुद्दा अतिशय ठळकपणे अनेक लेखांमधून वारंवार पुढे आलेला आहे.
आणखीन एक महत्त्वाचा विचार सर्वच लेखातून पुढं येतो. तो म्हणजे आपल्या सर्वच प्रकारच्या विकासाशी खेळाचा जवळचा संबंध आहे. भाषाविकासाशीसुद्धा. मुलं ज्यावेळेला स्वत:चे स्वत: नियम ठरवून खेळत असतात, निर्णय घेत असतात तेव्हा कशा प्रकारची भाषा वापरतात याची उत्तम उदाहरणं लेखांमधून आलेली आहेत. माझ्या अनुभवांशी ते खूपच चपखल जुळतं. कारण आमची मुलं, आदिवासी मुलं अगदी गप्प असतात. यांची संस्कृतीच मुकी आहे की काय असं वाटावं इतकी ती गप्प असतात. खेळताना मात्र ती स्वत:च्या भाषेत उदंड बोलत असतात. ती बोलत नाहीत याचं कारण कदाचित असं आहे की मराठीशी त्यांचा तेवढा परिचय नाही. पण त्यांना स्वत:ला एक अवकाश मिळाला, मोकळेपणा मिळाला की जी बडबड सुरू होते, त्यात स्वत:च्या भाषेत भांडणं, वाद घालणं या सगळ्या गोष्टी खूप सहज आणि जोमाने पुढे आलेल्या दिसतात. खेळासाठी अवकाश ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पण दुर्दैवाने ती हळूहळू संपत चाललीये.
खेळामधून अनौपचारिकपणे मुलांचं अनुभवविश्व विस्तारत असतं. जेव्हा कधी शिकायचं असतं तेव्हा त्याचं औपचारिक ज्ञानामध्ये रूपांतर होतं. पण ती संधीच न देता, खेळाच्या माध्यमातून अनुभव मिळवण्याचा अवकाशच न देता थेट औपचारिक माहिती मुलांच्या डोक्यामध्ये कोंबण्याचा जो उद्योग चालवला जातो त्यामुळे मुलांचं नक्की नुकसान होतं. मुलं तुम्ही सांगितलेली माहिती कदाचित लक्षात ठेवतील, पुन्हा सांगतील, परीक्षेमध्येही बरोबर लिहितील. पण त्यांच्याकडे स्वत:च्या अनुभवाचा पाया असेल का? सांगितलेल्या माहितीचे अर्थ शोधण्यासाठी अनुभवांची जी एक समृद्धी पाहिजे ती असेल का? याचं उत्तर आज आपल्याला नकारार्थीच मिळतं; कारण ते अनुभव मुलांना कधी दिलेच गेले नसतात. तेवढा अवकाशच आपण त्यांना ठेवलेला नाही. जीवन गतिमान होतंय, स्पर्धात्मकता वाढतेय ना तर मग अगदी लहानपणापासून स्पर्धा करायला शिकवा. म्हणजे मग बरोबर शिकतील ती स्पर्धा करायला ! हा अत्यंत अशास्त्रीय विचार आहे, असं मला वाटतं. जगात पुढं जाऊन स्पर्धेला तोंड द्यायचं म्हणून स्पर्धेशिवाय दुसरा कुठलाही विचार करू शकत नाहीत, अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर ते मुलांसाठी घातकच होईल. ही वृत्ती कोणत्याही प्रकारे मुलाच्या विकासाला पोषक होईल असं मला वाटत नाही.
सामान्यपणे एखाद्या विषयाकडे बघताना त्याचे वेगवेगळे आयाम विचारात घेतले जातात. या अंकात मानसशास्त्राचा, तत्त्वज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आयाम आहे; याशिवाय एक वेगळा आयाम घेतलाय तो म्हणजे-स्त्री-पुरुष समानता. याचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो.
खेळ हे मुलांच्या विकासाचं एक नैसर्गिक अंग आहे असं आपण म्हणतो. तेव्हा ते ‘मूल’ म्हणताना मुलगा आणि मुलगी असं दोन्ही गृहीत असतं. प्रत्यक्षात मात्र मुलग्यांचा खेळ वेगळ्या प्रकारे विकसित होताना दिसतो. मुलींचा खेळ विकसित होतो की नाही माहीत नाही, बर्यााच वेळेला मारलाच जातो. हे अगदी नकळतपणे, सहजपणे आपल्या हातून होत असतं. प्रतिष्ठित, सत्ताधारी वर्गात जे योग्य मानलं जातं, त्याला प्रोत्साहन मिळत जातं. जे अयोग्य मानलं जातं ते मागं ढकललं जातं. अशा प्रकारच्या गर्भित हेतूंचा हा प्रश्न माधुरी दीक्षित यांनी लेखातून मांडला आहे.
संगणक ही आता सर्वदूर पोचलेली बाब आहे. ग्रामीण भागातही मुलांपर्यंत संगणक पोचलेला आहे. या संगणकाच्या आधारानं आलेले खेळ मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम घडवतात - यावरचा डॉ. राजेंद्र लागू व संजीवनी कुलकर्णींचा लेख आहे. मला वाटतं, खेड्यामध्ये राहणार्यान आमच्या मुलांना त्याची एवढी झळ अजूनतरी लागलेली नाही. पण तरी ‘आधीच सावध राहिलेलं बरं’ अशी एक सूचना आपल्याला या लेखातून निश्चितपणे मिळते.
एखाद्या विषयाचा अभ्यास जेव्हा आपण करतो, तेव्हा चौफेर नजरेनं, अनेक अंगांनी त्याच्याकडे बघणं ही प्रक्रिया महत्त्वाची असते. या अंकाची निर्मिती करणार्या गटाला ती प्रक्रिया जवळून अनुभवता आली असणार असं मला वाटतं. अनेक वेगवेगळ्या पैलूंमधून त्यांनी खेळ या विषयाचा अभ्यास केलाय.
ज्याकाळी मानसशास्त्र, बालमानसशास्त्र अशा शाखा तयार झाल्या नव्हत्या त्याकाळातलं फे्रडरिक फ्रोबेलचं काम आहे. फ्रेडरिक फ्रोबेलच्या तत्त्वज्ञानाबद्दल अंकात दोन ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. पण पहिल्या विभागामध्ये त्याच्यावरचा एखादा लेख असता तर अधिक चांगलं झालं असतं. हे काम पुढच्या कुठल्यातरी अंकामध्ये पालकनीतीनं निश्चितच पूर्ण करावं.
एकूण काय तर खेळासारखा ‘बिनमहत्त्वाच्या वाटणार्या’ पण ‘अत्यंत महत्त्वाच्या असणार्या' एका विषयाचा विविध अंगांनी धांडोळा घेतलेला अंक आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. ज्यावेळी विशेषत: मराठीत गंभीर लिखाणाची अथवा शास्त्रीय लिखाणाची वानवा आहे, अशा वेळेला हा अंक आलेला आहे. शिक्षक, पालक व इतर सर्वांनी हा अंक जरूर वाचावा, संग्रही ठेवावा आणि त्यातनं जे काही कुतूहल चाळवेल, त्याचा आधार घेऊन आपलं पुढचं वाचन सुरू करावं अशा दर्जाचा हा अंक झालाय.
मला अंक खूप आवडला, तुम्हाला ही आवडेल अशी खात्री वाटते. जरूर वाचा. यातल्या काही विषयांवर पुढे चर्चा सुरू व्हावी, पालकनीतीच्या पुढील अंकात चालू रहावी, त्यात तुम्ही भाग घ्यावा असं आवाहन मी करतो.
खेळ हा विषय दिवाळी-विशेषांकासाठी निवडला ही कल्पनाच खूप आवडून गेली. त्याबद्दल पालकनीती गटाचं अभिनंदन. मुखपृष्ठावरील साबणाचे बुडबुडे करणार्या. मुलीचा चेहरा ग्रामीण मुलीशी साम्य दाखवणारा असल्यानं अधिकच भावला. हे मुखपृष्ठही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं.
या अंकातील तीन लेख मला विशेष आवडले. प्रियंवदा बारभाई यांचा ‘बालमनाची गुरूकिल्ली’ हा वैचारिक लेख, शुभदा जोशींची ‘वेगळी बाजू’ सांगणारी मांडणी, अनुभव. (हे अनुभव शहरी झोपडपट्टीतले असले तरी आमच्या ग्रामीण अनुभवांशी ते खूप relate करता आले.) आणि डॉ. समीर कुलकर्णी यांचा लेख. या लेखाचा आवाका थक्क करणारा आहे. त्यांनी खेळ ही संकल्पना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पाहिलेली आहे. जीवनाला स्पर्श करणारी, व्यापक विचारांशी, शाश्वरत सत्याशी जोडलेली ही कल्पना मांडणारा लेख मनापासून आवडला.
खेळ संकल्पनेची सखोल वैचारिक चर्चा एकंदरीतच अंकातून मांडण्यात आलेली आहे. सामान्य वाचकांसाठीही ती उपयुक्त अशीच आहे. पण तरीही अनुभवाधिष्ठित लेख अजून असायला हवे होते असं वाटतं. प्रत्यक्षाच्या अंगणातील लेखांतही काहीशी पुनरावृत्ती वाटली. अशोक वाजपेयींचा लेख छान असला तरी या अंकात देण्यामागचं प्रयोजन कळलं नाही. एकूणात अंक उत्तमच आहे, पण भूक भागली नाही. म्हणून एक कल्पना सुचवावीशी वाटते.
या खेळ विशेषांकाचा उत्तरार्ध म्हणून आपण असाच एक दणदणीत अंक काढावा. आणि राहून गेलेल्या मुद्यांचा समावेश त्यामध्ये करावा. यासाठी मी काही मुद्दे सुचवू इच्छिते.
१. आताच्या अंकात बहुतेक सर्व पाश्चिमात्य विचारवंतांचे लेख आहेत. पौर्वात्य देशांमध्ये ‘खेळा’चा विचार कसा झालेला आहे याचा धांडोळा घेता येईल. यामध्ये भारतातील गांधीजी, टागोर ह्या विचारवंतांनी काय म्हटलंय, कसं बघितलं ते पाहता येईलच. पण चीन, जपान या देशात याविषयीचं काय काम झालेलं आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे. आताच्या अंकात ती उणीव राहून गेलेली आहे.
२. प्रयोग आणि खेळ यांचं एक समीकरण असल्याचं मला जाणवतं. माणूस प्रयोग करत असतो म्हणजेच खेळून बघत असतो, आणि खेळून बघत असतो म्हणजेच प्रयोग करून बघत असतो. दोघांमधलं हे नातं उलगडून दाखवता येईल. खेळाचं ललितकलांशी असणारं नातं, वेगवेगळ्या माध्यमांशी खेळून बघणं उदा, कवीचं शब्दांशी खेळणं, गायकाचं सुरांशी खेळणं इत्यादीपासून ते जादू, अंधश्रद्धा यामधला खेळ आणि प्रयोग अशी काही मांडणी करता येईल.
३. पाल्यांना काय वाटतं, मुलं याकडं कसं बघतात ही बाजू पण यायला हवी. विशेषतः खेळघरातून मोठं होऊन बाहेर पडलेल्या मुलांना काय वाटतं, काय फरक, बदल जाणवतो? ते, त्यांचे पालक याकडं कसं बघतात वगैरे.
पुन्हा एकदा अभिनंदन !
मेधा टेंगशे, साधना व्हिलेज, चिखलगाव, ता. मुळशी, जि. पुणे
‘खेळ’ हा विषय सर्वांगाने ह्या अंकात पडताळलाय - त्याचं वेगवेगळ्या वयात असलेलं manifestation, त्याची गरज आणि खेळाची हल्लीच्या युगात अ-सत्य रूपंही. खेळाचे महत्त्व ह्या अंकामुळे पालक व शिक्षक दोघांना पटेलच! पण ‘कळलं’ पेक्षा ‘वळतंय’ का, हे जास्त महत्त्वाचं नाही का?
तर, बरेचदा पालक आपल्यातलं मूल हरवलेले असतात, किंवा आपल्या संस्कृतीच्या विळख्यात अडकलेले असतात किंवा स्वतःच्या बालपणातले कटू अनुभव कवटाळल्यामुळे अनेकदा मोकळेपणाने जगतच नाहीत. त्यामुळे मुलांवरही अपेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त बंधनं लादतात. पालकांना ह्यातून मोकळं करायचे मार्ग किंवा सोयी सुचवल्या तर पालकही खेळकर होऊन मुलांचे खेळायचे मार्ग मोकळे होतील आणि PLAY (Peace, Leadership And Young People) खर्याक अर्थाने human bonding आणू शकेल.
शुभदा काटदरे, पुणे
दिवाळी अंक आवडला, सर्व लेख माहितीपूर्ण आहेत. दिवाळी अंकाची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो. यावेळचा अंक सुंदर फोटोंनी सजलेला होता. खेळ या विषयाची सर्वांगाने मांडणी होती. मात्र आम्हांला ज्याची अपेक्षा होती आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर शोधायला अंकाची मदत होईल असे वाटले होते, ते अंकात सापडले नाही. सातवी-आठवीमधील मुली खेळणे हळूहळू सोडून देतात आणि मैदानावरती गप्पा मारत राहायला त्यांना आवडते. असे का होते आणि हे टाळण्यासाठी काय करावे यावर काही मार्ग सापडत नाही. त्यादृष्टीने आम्ही अपेक्षेने या अंकाकडे बघत होतो. मात्र अंक १२ वर्षांपर्यंतच्याच वयोगटाबद्दल बोलतो. त्याचप्रमाणे अंकात सैद्धान्तिक माहिती जास्त आहे असे वाटले, पण ते ठीकच आहे.
दीपा पळशीकर, आनंद निकेतन, नाशिक
अंक मिळाला, आवडला, खेळ एका वेगळ्या दृष्टीने समजावून घेता आला. एक शिक्षक म्हणून खेळ मला मित्र वाटतात. शाळा सुरू झाल्यापासून शाळा सुटेपर्यंत खेळच आम्हाला जवळ आणतात, बांधून टाकतात.
अंकाच्या शेवटी शारीरिक, बौध्दिक, मानसिक, भावनिक विकसनासाठी काही खेळ सुचवता आले असते तर अंकात भरच पडली असती.
फारुक काझी, सांगोला
मूल कधी हवं आहे आणि का हवं आहे हे प्रश्न सोपे नाहीत. प्रत्यक्ष मूल होण्याआधी त्याचा विचार कसा केलेला दिसतो, कोणत्या निकषांवर निर्णय घेतले जातात याबद्दल...
अलीकडे विवाहपूर्व समुपदेशनासाठीही बरीच जोडपी येतात. समाजातील हा बदल स्वागतार्ह आहे. ह्या तरुण जोडप्यांशी बोलताना, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं अवलोकन करताना प्रश्नांचे अनेक कंगोरे माझ्या नजरेला दिसू लागतात. वेगवेगळ्या प्रश्नांवर मोकळ्या मनाने चर्चा होते.
![]()
ह्या चर्चेमध्ये एक मुद्दा असतो गर्भधारणा नियोजनाचा - लग्नानंतर मूल केव्हा होऊ द्यायचं?
‘‘निदान पहिली तीन वर्षं - कमीत कमी दोन वर्षं तरी आम्हाला मूल नको आहे. म्हणजे आधी स्थिरस्थावर व्हायचं आहे - मगच मुलाचा विचार.’’
‘‘उत्तम विचार आहे’’ असं म्हणून मी त्यांना वेगवेगळ्या गर्भनिरोधक औषधांची, साधनांची माहिती द्यायला लागते.
‘‘नाही, पण ह्याचे काही वेगळे - दुष्परिणाम नाहीत ना? गोळ्यांमुळेे ‘ति’ला त्रास व्हायला नको.’’ इति ‘तो’.
‘‘या गोळ्यांचे काहीच दुष्परिणाम नाहीत, असं नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत द्यावीच लागते.’’ मी सांगते. मग मी साधनाची उपयुक्तता, साधन फसण्याची आणि गर्भधारणा होण्याची शक्यता किती आहेे, ते वापरण्यातल्या अडचणी आणि शेवटी दुष्परिणाम यांचा पाढा वाचते आणि ‘‘हे सगळं समजावून घेतलं की त्यातलं काय वापरायचं ह्याचा निर्णय घेणं सोपं जातं.’’ असं म्हणून मी प्रत्येक औषधाची, साधनाची स्पष्ट माहिती त्यांच्यापुढे ठेवते.
‘‘पण डॉक्टर, माझ्या मावसबहिणीनं ह्या गोळ्या दोन तीन वर्षे घेतल्या आणि त्यानंतर तिला दिवसच राहत नाहीयेत. आई म्हणते - तिनं गोळ्या घेतल्या म्हणून आता तिला दिवस राहत नाहीत - असं असतं का?’’
हा तसा अनेकदा समोर येणारा प्रश्नह आहे. गर्भनिरोधनाची साधनं किंवा औषधं वापरली म्हणून ती थांबवल्यानंतरच्या काळात गर्भधारणा होत नाही असं नसतं. कदाचित मुळातच असलेला दोष किंवा काही कमतरता गर्भधारणा न होण्याला कारणीभूत असू शकते. इतके दिवस गर्भनिरोधनाची साधनं वापरल्यामुळे हा प्रश्नत लक्षात येण्याचं कारण नव्हतं. आता आपल्याला प्रश्नु दिसत असला तर त्यावर उपाय शोधावे लागतील इतकंच.
लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी परदेशी नोकरी, पैसे, मग पुढच्या वर्षी कार, मग घर आणि त्यानंतर मूल ह्या क्रमानं आजकाल मूल होण्याच्या निर्णयापर्यंत मायबाप पोचतात.
पहिल्या तीन गोष्टी कदाचित आपल्या हातात आहेत, चौथी - केव्हा मूल होऊ द्यायचं हे कदाचित अगदी संपूर्णपणे आपल्या हातात नसतं. मूल होऊ न देणं ह्यासाठीचा लगाम विज्ञानानं आता आपल्या हातात आणलेला आहे. योग्य तर्हेसनं वापरल्यास अतिशय उपयुक्त व परिणामकारक गर्भनिरोधनाची साधनं उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला हवी तितकी वर्षं गर्भनिरोधन करता येतं. निरोधनाची ही शक्ती विज्ञानामुळे आपल्या हाती आल्यामुळे - ‘प्रजनन केव्हा, तर मला पाहिजे तेव्हाच’ - असं सामर्थ्य आपल्या हातात असल्याचा भास होतो आणि ते घडलं नाही की अस्वस्थता येते.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे संवाद बरेच वेळा असेच असतात -
‘नाही डॉक्टर, इतक्यात तर नाहीच. आताच नको. अहो, आम्ही अजून तयार नाही.’
‘अजून मानसिक तयारी झाली नाही आमची.’
‘आम्ही एकमेकांनाही अजून नीट ओळखत नाही.’
‘एवढ्यातच घरासाठी नोंदणी केलीय. त्याचा हप्ता जाणार आहे - पुन्हा मुलाचा खर्च केवढा असतो हो - सध्या तरी शक्य नाही !’
‘तो तर आता अमेरिकेला चाललाय, दोन महिन्यांनी मीही जाणार आहे - आता कसं शक्य आहे?’
उच्च आर्थिक स्तरातील जोडप्यांचे हे उद्गार आहेत. विचार करण्याची ही पद्धत काही बाबतीत मागील पिढीपेक्षा वेगळी आहे, अधिक चांगलीही आहे. एकमेकांना आधी समजून घेतलं पाहिजे, मुलाला वाढविण्याची आपली आर्थिक क्षमता हवी हे विचार आज भावी मातापित्यांच्या मनात येतात हे एका अर्थी बरोबरच आहे; पण सदनिका घेण्याचा विचार, परदेशगमनाचा विचार, कार पाहिजे हा विचार आणि मूल होऊ देणं हा विचार एकाच तराजूत तोलले जातात, त्याचं महत्त्व सारखंच ठरवलं जातं; अशावेळी हे भल्या दिशेनंच जात आहे की भलत्या असा प्रश्न् मनात येतो. ठरल्यापेक्षा चुकून वेगळ्या वेळेला जर गर्भधारणा झाली - तर ह्या विचारांचे आणखी काही कंगोरे दिसू लागतात.
दिवस राहीपर्यंतच्या चर्चेत सहसा बाकी कुटुंबीय भाग घेत नाहीत. अगदी मत विचारल्यावरही ‘त्यांचं त्यांना सांभाळायचं आहे - त्यांनाच ठरवू देत’ असं मत पन्नास-पंचावन्न वर्षांची आजी आजोबा होणार असलेली पिढी क्वचित देते. अर्थात इतक्या निर्लेपपणाचं प्रमाण आपल्याकडे तसं कमीच आहे; अजूनही आपल्याकडे सामान्यपणे अपत्यजन्म हा कौटुंबिक मामला आहे, मूल होण्याचा निर्णय कुटुंबात घेतला जातो, निर्णयाच्या कार्यवाहीतही कुटुंबाचा आधार असतो. आजच्या काळात बहुतेक घरात आपल्या सत्तर-ऐंशी वर्षांच्या आईवडिलांना ही मधली पिढी सांभाळते आहे, आणि त्यांची मुलं-सुना, जावई हे परदेशात स्थिरावू पाहणारे आहेत. या परिस्थितीतून त्यांचे असे उद्गार निघालेले दिसतात.
मुलांनी ‘चान्स’ केव्हा घ्यावा ह्याबाबतीत ह्या मधल्या पिढीचे काही गमतीदार उद्गार ऐकू येतात.
‘थोडे दिवस मजा करू देत त्यांना, मग आहेच संसार मागे.’
‘आमचं एक झालं लवकर - त्यांना नको इतक्या लवकर लोढणं !’
एके काळी लग्नानंतर पहिल्या वर्षात पाळणा हलण्याची सामाजिक सवय असलेल्या आपल्या समाजात ही अशी वाक्यं ऐकायला मिळाली तरी थोडं बरं वाटतं, गंमत वाटते.
लग्न झाल्यावर दुसर्यां महिन्यात मानसीला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. निसर्गक्रमाप्रमाणे घडलं. गर्भनिरोधनाची साधनं वापरली नाहीत तेव्हा निसर्गानं आपलं काम चोख केलं. खरं म्हणजे अपेक्षेपेक्षा दिवस लवकर राहिले ह्यापलीकडे वेगळं काहीच घडलं नव्हतं. सासर माहेरची परिस्थिती, तिच्या आयुष्यातला प्राधान्यक्रम काहीच अडचणीचं नव्हतं. असं असूनही मानसी आणि पंकज गडबडून गेले होते. तिची सासू त्यांना माझ्याकडे घेऊन आली. बराच वेळ त्यांच्याशी बोलून, सगळ्या गोष्टींची चर्चा करून त्यांनी गर्भपाताचा निर्णय घेऊ नये, तसं पुरेसं कारण आपल्याजवळ नाही, निदान पुन्हा एकदा नीट विचार करावा, असं मी सुचवलं. त्यांनाही ते मान्य झालं. मानसी आणि पंकज माझ्यासमोरून निघाल्यावर मानसीची सासू माझ्याकडे वळून म्हणते - ‘‘डॉक्टर, मला वाटलं होतं, ह्याचं लग्न झाल्यावर मला थोडा आराम मिळेल. काही दिवस तरी सुटका होईल पण या मुलांनी विचारच केला नाही. इतकी अक्कल नको का यांना?’’
समाजाच्या एका स्तरात वर उल्लेखलेले प्रश्नन दिसतात तर दुसर्यान स्तरात दिवस राहिले नाहीत तर ‘काहीतरी मोठं चुकतंय’ असं आजही समजलं जातं. सोळाव्या वर्षी ताराचं लग्न करून देऊन तिच्या आईनं कर्नाटकात पाठवलं. सहा महिन्यात सासूनं तिला दिवस राहत नाहीत म्हणून गावात ‘देवर्षी’कडे नेलं. मुलगी आजारी पडली. तिच्या पोटदुखीवर इलाज करण्यासाठी आईनं तिला इकडे आणली. खरं तर दुखणं पोटात नव्हतंच! तो इलाज करत असताना तिची आईही म्हणत राहिली, ‘‘पण एक मूल होऊन गेलं म्हणजे बरं होईल.’’ तिला स्वतःला तारा वयाच्या चौदाव्या वर्षीच झाली होती. तिचं आजचं वय होतं तीस वर्षं ! तरीही ताराला सोळाव्या वर्षी मूल झालं पाहिजे ह्याबाबतीत तिचं आणि ताराच्या सासूचं एकमत होतं !
वैद्यकशास्त्र असं सांगतं की वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत गर्भाशयाची, कटिबंधाच्या हाडांची, एकूण शरीराची क्षमता गर्भधारणा आणि पुढं नऊ महिने गर्भाचा भार वाहणं ह्या दृष्टीनं योग्य नसते. साधारणतः एकवीस ते पंचवीस वर्षं ह्या वयापर्यंत स्त्री पहिल्या गर्भधारणेस योग्य ठरते. नवीन जीवनशैलीमध्ये मुलीचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय ह्या सगळ्याचा विचार करता सव्वीस-सत्तावीस वर्षांनंतरच पहिल्या बाळाचा विचार व्हायला वेळ सापडतो असं दिसतं. बदलत्या काळानुसार ते योग्यही आहे ह्यात शंका नाही. तरीही ‘कधी’ ह्याचा विचार मुलीनं वयाच्या तिसाव्या वर्षाच्या आतच करावा असा सर्वसाधारण वैद्यकीय विचार आहे. याचं एक कारण - सुरुवातीला म्हटलं तसं - मूल हवं हे ठरवल्यानंतर काही ठरावीक काळ निसर्गाला देणं क्रमप्राप्त आहे. त्यात गडबड करून चालत नाही. त्या वर्षभराच्या काळानंतर कुठे अडथळा आहे याचा शोध सुरू करावा लागतो. त्या तपासण्या होऊन, निष्कर्ष निघून, उपाययोजना होईपर्यंत आणखी काळ निघून जातो. स्त्री अथवा पुरुष कुणामधेही हा अडथळा असू शकतो. सर्वच संबंधितांचं वाट पाहणं ताणलं जाऊ लागतं आणि ‘कधी हवं’ हा प्रश्न जाऊन ‘का होत नाही’, ‘आता काय करू’ ही तगमग सुरू होते.
निसर्गाचीसुद्धा अद्भुत गंमत आहे. पुरुषबीजं तयार होण्याची प्रक्रिया निरोगी पुरुषाच्या शरीरात चालू असते. तेव्हा चौर्या हत्तर ते नव्वद दिवसात एक चक्र पूर्ण होऊन लाखो शुक्रजंतू तयार होतात. प्रत्येक शरीरसंबंधात ते योनिमार्गात प्रवेश करतात. गर्भाशयातून गर्भनलिकेत पोहोचल्यावर तिथं तयार असलेलं - फुटलेलं स्त्रीबीज असणं आवश्यक असतं. त्या लाखोंपैकी एकाचा त्या स्त्रीबीजाशी संबंध येऊन गर्भधारणा होते. हे स्त्रीबीज मात्र संपूर्ण महिन्यामध्ये - ऋतुचक्राच्या एका आवर्तनामध्ये एकच तयार होतं. ते तयार होण्याच्या कालावधीच्या सुमारास चोवीस ते बेचाळीस तासात जो शरीरसंबंध होतो तो गर्भधारणेस कारणीभूत ठरतो; नियमित पाळीचं चक्र असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत स्त्रीबीज तयार होण्याचा दिवस पाळीच्या अकराव्या दिवसापासून ते विसाव्या दिवसापर्यंतच्या दिवसातला कोणतातरी एक असतो.
स्त्रीच्या शरीरात अपरिपक्व स्त्रीबीजांचा साठा स्त्रीपिंडामध्ये सुप्तावस्थेत असतो. तो मर्यादित संख्येत असतो. स्त्रीगर्भ मातेच्या पोटात असतो तेव्हापासूनच तो असतो. मुलीनं तारुण्यात पदार्पण केलं की दर महिन्याला एक - एक स्त्रीबीज पक्व होऊ लागतं. त्याचा पुरुषबीजाशी संबंध आला की गर्भधारणा होते.
अपरिपक्व बीजांच्या साठ्यापैकी एका महिन्यातल्या चक्रात सामान्यपणे एकच स्त्री-बीज पक्व होत असल्यामुळे, वाढत्या वयाबरोबर ह्या स्त्रीबीजाचं वयही वाढत जातं. वयाच्या पंधरा वर्षं ते पंचेचाळीस वर्षं ह्या कालावधीत दर महिन्याच्या चक्राला एक स्त्रीबीज वापरलं जातं. चाळिशीच्या सुमारास ह्या स्त्रीबीजांची गुणवत्ता कधी कधी कमी होते. गर्भामध्ये गुणसूत्रांमधल्या दोषांची शक्यता वाढते. परिणामी वैद्यकीय दृष्टीनं आमचा सल्ला असतो की पहिलं मूल तीस-बत्तीसपर्यंत झालेलं बरं ! शिवाय मूल उशिरा झालं की पुढेही जरा उतार वयात पालकत्वाच्या जबाबदार्याय अंगावर येणार ! असो.
ही झाली किंचितशी शास्त्रीय चर्चा पण ह्यातूनही मूल कधी ह्याचं उत्तर मिळत नाही.
मुग्धालाही असे उशिराच दिवस राहिले आणि ती तपासणीसाठी येऊ लागली. एक दिवस मला म्हणाली, ‘‘डॉक्टर, मूल हवं, आता व्हायला हवं हे वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं ठीक आहे पण माझ्यापुरतं म्हणाल तर मला अजून सगळं उमगलेलं नाही. माझ्या मनात अजून गोंधळ आहे. कल्पना, भावना, विचार, इच्छा म्हणून मूल होऊ देण्याच्या कल्पनेशी खेळताना मला खूप बरं वाटत होतं. अधीरताही होती पण आता - मूल होण्याची वेळ जवळ येऊन ठेपल्यावर आपल्याला ते खरोखरच हवं आहे का ते कळत नाहीये.’’ मुग्धाचं वय वर्षं छत्तीस!
मूल होण्याचा, असण्याचा निखळ आनंद कसा असतो, ह्याची जाणीव आपल्याला कितीशी असते?
शिक्षण संपल्यावर, आर्थिक सुबत्ता आल्यावर, आजूबाजूचे लोक म्हणू लागले म्हणून एक उणेपण जाणवू लागतं आणि मग मूल हवंसं वाटू लागतं.
‘मूल, कधी व्हायला हवं?’ ह्याचं उत्तर ‘जोडप्याला हवं असेल, त्याचा त्यांना आनंद मिळणार असेल तेव्हा, त्यांना स्वत:ला मूल वाढवण्याची इच्छा मनापासून वाटत असेल तेव्हा’ असं असायला हवं, असं मला वाटतं.
जगातली कोट्यवधी माणसं मूल होण्याचा निर्णय घेत असली तरी खरोखर विचारपूर्वक त्यातले किती जन्म घडतात हे एक कोडंच आहे. तंत्रज्ञानाची प्रगती, संपत्ती हेच यश हा विचार आणि मानवी भावभावना, इच्छा, नैसर्गिक ऊर्मी, ऐहिकापलीकडचा चिरंतनाचा विचार ह्यांच्यामध्ये एक शाश्वगत पूल निर्माण झाला तर कदाचित मूल कशासाठी व कधी ह्याचा शोध माणसाला त्याच्या अंतर्मनात घेता येईल.
‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ भारतातल्या सहा ते चौदा वयोगटातल्या सर्व मुलांना मिळावं यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ साली पारीत झाला, हे आपल्याला माहीत आहेच. त्यात शाळेत न जाणार्या मुलांना शाळेत आणणं ही शिक्षक-पालक-सरकारची मुख्य जबाबदारी आहे, असं महत्त्वाचं कलम आहे. पण गेल्या दोन वर्षात त्या दृष्टीनं झालेले प्रयत्न अजूनही अपुरे आहेत - शाळेत न जाणार्यान (शाळा सोडलेल्या + कधीच न गेलेल्या) मुलांसंबंधीच्या काही जुन्या - नव्या अहवालातील आकड्यांवर नजर टाकली तर या उद्दिष्टासाठी अजून किती वाट चालायचीय याची कल्पना येईल.
भारतातील स्थिती
२००५
एकूण मुले (अंदाजे) = १९ कोटी ३० लाख
शालाबाह्य (अंदाजे) = १ कोटी
टक्केवारी = ६.९४
२००९
एकूण मुले (अंदाजे) = १९ कोटी
शालाबाह्य (अंदाजे) = ८१ लाख
टक्केवारी = ४.२६
महाराष्ट्रातील स्थिती
२००५
एकूण मुले (अंदाजे) = १ कोटी ६६ लाख
शालाबाह्य (अंदाजे) = ५ लाख २९ हजार
टक्केवारी = ३.१८
२००९
एकूण मुले (अंदाजे) = १ कोटी ६६ लाख
शालाबाह्य (अंदाजे) = ३ लाख ७ हजार
टक्केवारी =१.२६
(SRI-IMRB या संस्थेने सर्व शिक्षा अभियानासाठी केलेल्या सर्वेक्षणातून. http://ssa.nic.in/research-studies-doc )
= या पार्श्वभूमीवर एक आशेचा किरण वाटावा असा अहवाल गेल्या महिन्यात हाती आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले ह्या आदिवासी दुर्गम तालुक्यातील शिक्षण विभागानं ८५० शालाबाह्य मुलं शाळेत दाखल करण्याच्या मोहिमेचा हा अहवाल आहे. अकोले तालुका शिक्षण विभाग, पंचायत समिती यांनी २०१० आणि २०११ मध्ये सर्व शिक्षण अभियानांतर्गत ही मोहीम राबवली. या कामात त्यांच्या साथीला ‘पर्यायी शिक्षण’ या विषयाचे तज्ज्ञ श्री. हेरंब कुलकर्णी होते.
= मूल जेव्हा शाळेमधे जात नाही किंवा शाळेत दाखल केल्यानंतरही शाळा सोडून जातं, तेव्हा त्याच्यामागे प्रत्येक वेळी वेगळं, नवीन कारण असतं. कित्येकदा ती कारणं शिक्षकांच्या हाताबाहेरचीच असतात. पालक एका जागी राहणारे नसतात, वीटभट्टी, दगडखाणी किंवा वाट्यानं शेती करायला जाणारे असतात. अनेकदा दहा अकरा वर्षांची मुलं त्यांच्यासह राबायला जातात. कधी अशा अकरा-बारा वर्षांच्या मुलांनाच हॉटेलमधे, भंगार गोळा करायला, शेतावर मजुरीला नाहीतर गुरं वळायला पाठवून दिलेलं असतं. अशा परिस्थितीतही मुलानं शाळेत यावं, शिकावं, शहाणं व्हावं यासाठी या तालुक्यातल्या एकेका शिक्षकानं पालकांना भेटून पाठपुरावा केला. त्यांना जाणीव करून दिली की शिकणं - शाळेत जाणं यातच मुलाचं भलं आहे.
शालाबाह्य मुलांनी शाळेत यावं यासाठी एकेकट्या शिक्षकाचं सांगणं - समजावणं काय पुरं पडणार? त्यांनी कितीही पाठपुरावा केला, भांडण केलं, दुरुत्तरं ऐकून घेतली तरी परिस्थिती तशीच रहायची ! म्हणूनच इथल्या शिक्षणविभागानं इतर सरकारी अधिकार्यां ची मदत घेतली. तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या सहीचं एक पत्र तयार केलं. ते शालाबाह्य मुलांच्या गावातल्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना दिलं. शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याचं आवाहन यात केलं होतं. मुलांची यादीही त्याला जोडली होती. गटविकास अधिकार्यांलनी ग्रामसभेच्या अजेंड्यावर हा विषय घेतला. ग्रामसभा निरीक्षकांना पत्र देऊन ३५ गावांच्या ग्रामसभेत या पालकांना बोलावून या विषयावर चर्चा झाल्या. हा गावकर्यां चा प्राधान्याचा विषय झाला. गावाचं दडपण पालकांवर निर्माण झालं. व्यक्तिगत लाभाच्या योजना देताना गावानं सर्व मुलांना शाळेत पाठवण्याची अट घातली. गावाच्या विकासाच्या संकल्पनेत गावातली सर्व मुलं शाळेत जाणं आवश्यक झालं. देवठाण गावचे सरपंच, उपसरपंच यांनी ठाकरवस्तीवर चकरा घालून आठवी-नववीतील पंधरा मुलं-मुली शाळेत हजर केल्या. शिक्षकांबरोबर आता तलाठी, ग्रामसेवक मदतीला आले.
पण जाणीवजागृतीची ही दिशा पुरेशी नव्हती. बालमजुरी हेही शालाबाह्य मुलं असण्याचं मोठं कारण होतं. अकोल्याच्या पोलीस निरीक्षकांनीही यासाठी प्रयत्न केले. पोलीस पाटलांची बैठक बोलावली. बालमजुरी कायद्याबाबत हेरंब कुलकर्णी लोकांशी बोलले. अकोले व राजूर पोलीस स्टेशन तसंच तालुका पत्रकार संघानं गावातील हॉटेल व्यावसायिक, भंगार व्यावसायिक, जीपमालक यांची एकत्र बैठक घेतली. त्यांना शिक्षणाचा कायदा समजावून सांगितला व महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर ‘बालमजूर म्हणून मुलांना राबवणार नाही, त्यांची वाहतूक करणार नाही’ अशी शपथ दिली. यानंतर पोलीस स्टेशननं आदिवासी ठाकर वाड्यांवर धाडी टाकायला सुरुवात केली. नंतर हेरंब कुलकर्णी व पोलीस यांनी ठाकर वस्तीवर जाऊन पालकांचं बालमजुरी कायद्याबाबत प्रबोधन केलं.
या सगळ्या मोहिमेचा फायदा अकोले तालुक्यात चांगल्या प्रकारानं झाला आहे. २०१० आणि २०११ मधे नोंद झालेल्या ९५० शालाबाह्य मुलांपैकी ८५० मुलं (त्यापैकी ३५५ मुली, तर ६४० आदिवासी) शाळेत हजर झाली. आणि शाळेत जात राहिली. यावर्षी झालेल्या पटपडताळणीमधे या मुलांपैकी ९५ टक्के मुलं हजर होती. या मोहिमेत कायद्यावर बोट ठेवून आठवीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांसाठी काम न करता शिक्षकांनी नववी, दहावीसाठीही प्रयत्न केले. अशी ३२ मुले शाळेत दाखल केली. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर तालुक्यातल्या माध्यमिक शाळा व आश्रमशाळाही या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. त्यातून दोनशेच्यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमधे व एकशेपन्नासच्यावर विद्यार्थी आश्रमशाळांमधे पुन्हा दाखल झाले. हे सगळे मजुरी करण्याच्या चक्रात अडकले असते. यांना वाचवण्यासाठी या मोहिमेचा जोरदार फायदा झाला.
आपल्या गावातली मुलं शाळेत जावीत म्हणून शिक्षकांनी मनापासून कष्ट घेतले. आधी नोंदणीसाठी आठ दिवस सर्वेक्षण केलं. पुढे मुलांचा पाठपुरावा करण्यासाठी तीस-तीस कि.मी. प्रवास केला. दुर्गम भागात पायपीट केली. पालकांशी वाद घातले, भांडणंही केली. शिक्षण विभागाचं काटेकोर नियोजन, गावाचे भाग पाडून त्यांची जबाबदारी व्यक्तिशः वाटून देणं, अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह ग्रामपंचायत, पोलीस यांची मदत घेणं, या सगळ्यातून ही मुलं शाळेत जाऊ लागली आहेत.
पण तरीही या प्रयोगातून काही प्रश्नही पडले, तेही मांडते.
पहिलाच प्रश्न वाटला तो म्हणजे अहवालाच्या नावाचा. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात म्हटलंय - ‘यशोगाथा ८५० शालाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करण्याच्या मोहिमेची.’
अहवालातच म्हटल्याप्रमाणे पालकांची कमालीची गरिबी, व्यसनं, विस्कटलेले संसार, आजारपणं या कारणांमधे बदल घडवण्याची या मोहिमेत काही शक्यताही नव्हती. मग ही मुलं शाळेत टिकण्याची अन् शिकण्याची आशा आपण कशाच्या जोरावर करायची? त्यामुळे ‘यशोगाथा’ हे नाव जरा वरचढच ठरतं. समजा इथे नाव देण्याची संधी आम्हाला मिळाली असती तर, ‘चला सुरुवात तर झाली’ ‘पहिली पायरी - शिक्षणाची’ असं नाव आम्ही दिलं असतं. कारण विद्यार्थी शाळेत दाखल होणं ही तर त्याच्या शिकण्याची (पुढे कधीतरी शहाणं होण्याची) फक्त सुरुवात असते. तो शाळेत येत राहणं, तिथं त्याला शिक्षणात रुची उत्पन्न होईल असं वातावरण मिळणं, विषय आवडेल - समजेल यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक मिळणं, हे पुढे घडायला हवं. प्रत्यक्षात आपल्या शाळांमधे शिक्षक असणं आणि त्यांनी रोज शाळेत येणं याचीसुद्धा वानवा असते. शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापनाची पद्धती हे तर पुढचे प्रश्न आहेतच.
पण तरीही या मोहिमेत कष्ट करणार्यांना यातून प्रोत्साहन मिळेल असं धरून नाव ठीक आहे असं मान्य करूया.
पुढचं आव्हान लक्षात घेऊया, ते म्हणजे हीच ८५० मुलं पुन्हा शालाबाह्य होऊ नयेत यासाठी सततच कराव्या लागणार्यास प्रयत्नांचं. यांच्या शिक्षकांना त्यासाठी दररोजच डोळ्यात तेल घालून जागरूक रहावं लागणार आहे. नाहीतर दरवर्षी १५ ऑगस्टला वृक्षारोपण करायचं... दोन चार महिन्यात ती रोपं मरतात. पण पुढच्या वर्षीसाठी खड्डे तयारच असतात... तसं व्हायचं.
दुसरा प्रश्न वाटला या मोहिमेतल्या पोलिसांच्या सहभागाचा. बालमजुरी रोखण्यासाठी आणि मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणं स्वागतार्ह आहेच. त्यांनी या मुलांना कामावर ठेवणार्यास हॉटेल व्यावसायिक, भंगार व्यावसायिक, शेतमालक, मुलांची वाहतूक करणारे जीपमालक या सार्यांेना बालमजुरीपासून परावृत्त करण्यासाठी शपथा दिल्या हेही चांगलं आहे. पण नंतर ठाकरवाड्यांवर - पालकांवर मात्र धाडी टाकल्या. त्यांना शपथा देण्याचा कार्यक्रम का नाही घेतला? धाडींनंतर मग प्रबोधन वगैरेचा उल्लेख आहे. पोलिसांच्या धाडींचा गरिबांच्या वस्तीवर काय परिणाम होतो, तो शिक्षणासाठी पूरक ठरेल का, हे काय सांगायला हवं?
तिसरा प्रश्न खरं तर अशा अहवालांबाबत काढायचा नसतो. पण हा अहवाल शैक्षणिक विषयासंबंधी असल्यामुळे सांगते. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करूनच अहवाल छापला गेलाय. ‘मजूरी, कुटूंब, सूट, ताइ, आइ, कौटूंबिक’ असे शब्द माझ्या छिद्रान्वेषी दृष्टीला अडतातच.
शाळेबाहेर राहिलेली मुलं शाळेत आणण्याची, त्यांना शिक्षण देण्याची जी सक्ती आहे, ती मोठ्यांवर आहे. हे काम करायचं ते मात्र ‘आपलं’ समजून केलं तरच होणार आहे. अकोले तालुक्याच्या या मोहिमेत पूर्ण गावानं सहभाग घेतलाय. सरकारी, गैरसरकारी सार्यां नीच कष्ट घेतलेत. सगळी मुलं शाळेत आणण्याची ही पहिली पायरी गाठण्यासाठी इतरही सगळ्या गावांमधून, जिल्ह्यांमधून असेच कष्ट घेतले जावेत. त्या प्रयत्नांना या निमित्तानं प्रोत्साहन मिळावं ही सदिच्छा.
शालाबाह्य मुलांची संख्या
नायजेरिया (२००७) ८६ लाख ६० हजार
भारत (२००८) ३८ लाख ५२ हजार
पाकिस्तान (२००९) ७३ लाख
संदर्भ : युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्स, २०११ डाटाबेस*
* या डाटाबेसमधील १७ देशांच्या आकडेवारीनुसार नायजेरिया आणि पाकिस्तान या दोनच देशात भारतापेक्षा जास्त शालाबाह्य मुले आढळतात. बाकी देशांची आकडेवारी इथे जागेअभावी दिलेली नाही.
का पुन्हा मला खजील करतोस?
का दिसतोस मला पुन्हा, पुन्हा
चहाच्या गाडीवर, हॉटेल, धाब्यावर
तुझ्या हातून चहा घेताना
आम्हाला मळमळत नाही, की तुझ्यासाठी मन कळवळत नाही.
मुले राष्ट्राची ‘संपत्ती’ असं म्हणतात
म्हणून लहानपणापासूनच
पैसे कमवायला हवेत....!
मी थांबवतो तुला
पण तू थांबत का नाहीस?
भटक्या विमुक्ताच्या लेकरा
जन्मभर का असाच भटकत फिरणार आहेस?
तुझ्या बहुरूप्याच्या नकला बघून
हसूच येत नाही बघ
दोरीवरून स्वतःचा तोल सावरणारा तू शिक्षणाच्या दोरीत
येणारच नाहीस का?
शिक्षण कायद्याचा वाजणारा नगारा
तुझ्या ढुमक्याच्या नादात,
कधी ऐकणारच नाहीस का...?
शालाबाह्य लेकरांपुढं व्यवस्था
आणखी कितीदा हरणार आहे...?
माझ्याच पोटचं लेकरू मला,
या लेकरांमध्ये
कधी दिसणार आहे...?
खेळ विशेषांकाच्या प्रकाशन समारंभाला हजर राहू न शकलेल्या माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीचा फोन येऊन गेला. डिसेंबरच्या अंकातला वृत्तांत तिनं वाचला होता. प्रदर्शन, विशेषांकाविषयी तिनं अगदी भरभरून विचारलंच, पण अजून एका गोष्टीविषयी तिला असलेली उत्सुकता दिसली. ती म्हणजे, ‘पालकनीतीची नवी वेबसाईट’. वेबसाईटवर काय गोष्टी आहेत, जुने लेख - अंक कसे शोधायचे, आपल्या वर्गणीदार नसलेल्या मित्र-मैत्रिणी-आप्तेष्टांना वेबसाईट बघता येईल का, इत्यादी प्रश्न तिला पडले होते. असे प्रश्न अनेकांनाच असू शकतील तेव्हा अंकातूनच त्याविषयी लिहावं असं वाटलं. खरं तर वेबसाईट प्रत्यक्ष पाहणं, त्यातल्या पानापानांवर जाऊन शोध घेणं, एका अर्थी ‘खेळून बघणं’ हेच महत्त्वाचं. तरीही नव्या ठिकाणी जाताना जशी आपण आधीच माहिती करून घेतो, तशीच ही वेबसाईटची तोंड ओळख -
१. संकेतस्थळाचं (वेबसाईट) नाव
www.palakneeti.org कोणत्याही ब्राऊझरमधून आपल्याला वेबसाईटपर्यंत पोहोचता येतं. पण टाईप करताना चुकलं किंवा इतर काही कारणांनी गोंधळ झालाच तर Google वर जाऊन ‘पालकत्व’ किंवा 'palakneeti' असं शोधलं तर आपला संकेतस्थळाचा पत्ता अगदी चटकन सापडतो.
२. मुख्य पानाची रचना
चित्रात दिसतंय ते आपलं घरअंगण - अर्थात होमपेज. हे वेबसाईटचं पहिलं पान आहे. त्यात शीर्षकपट्टी (title bar) , पर्यायपट्टी (menu bar) , निवेदन-सूचना (ticker) , ताज्या अंकाची जागा, गप्पा-संवाद-चर्चेची जागा, खेळघराची जागा आणि मध्यभागी फिरते फलक दिसत आहेत. यातली खेळघर आणि फिरते फलक मिळून होणारी डावीकडची सर्व बाजू निवडलेल्या पर्यायानुसार, वेगवेगळ्या प्रकारे वापरली आहे. उरलेल्या गोष्टी संकेतस्थळावर सतत दिसत राहतात. त्यामुळे कोणत्याही पानावरून दुसर्या् ठिकाणी जाता येतं. शीर्षकपट्टीवरून आपण फेसबुक, टि्वटरसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर जाऊ शकता. तसंच 'English site' वर click करून पालकनीती परिवार विषयीची इंग्रजी माहिती वाचू शकता. आपल्या अमराठी किंवा परदेशी मित्रमैत्रिणींना-पाहुण्यांना ही प्राथमिक माहिती उपयोगी पडेल. अर्थातच मासिकातले लेख मराठीत असल्यानं ते काही इंग्रजी पानांवर उपलब्ध नाहीत !
पर्यायपट्टीवरून विभाग - उपविभागांच्या पानांवर जाता येईल. निवेदन-सूचना देणारी एक सरकती पट्टी पर्यायपट्टीच्या खाली दिसते. आगामी कार्यक्रम, निवेदनं, वाचक - वर्गणीदारांसाठी सूचना इथे पहायला मिळतील. त्यातल्या कोणत्याही शब्दावर click करून सविस्तर माहिती कळू शकेल.
३. संकेतस्थळावरचे विभाग
वरच्या प्रश्नात संकेतस्थळाची तांत्रिक रचना आपण पाहिली. आता त्यातले विभाग पाहूया.
३.१ पालकनीती परिवार संस्था -यात संस्थेची भूमिका, आजवरचा प्रवास, विश्वस्त इ. गोष्टी वाचायला मिळतील.
३.२ पालकनीती मासिक -या विभागात ताजा अंक, जुने अंक, दिवाळी अंक, पालकनीती प्रकाशनं, जरूर वाचावेत असे निवडक लेख आणि बोलकी मुखपृष्ठं हे उपविभाग आहेत. याच विभागातून उत्साही लेखक आपलं लिखाण पालकनीतीकडे पाठवू शकतात.
३.३ खेळघर -यात खेळघर सुरू करण्यामागची भूमिका, प्रेरणा, आत्तापर्यंतची वाटचाल, सुरू असलेले प्रकल्प आणि आगामी कार्यक्रम अशी भरगच्च माहिती आहे. खेळघराच्या कामात सहभागी होण्याचं आवाहनही इथे सापडेल.
३.४ माहितीघर -आपल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांची यादी इतर काही वेबसाईट आणि वाचनीय लेख - पुस्तकांची सूची इथे उपलब्ध आहे. वाचकही नवीन वेबसाईट - लेख - पुस्तकं सुचवू शकतील अशी सोय इथे आहे.
३.५ गप्पा-संवाद-चर्चा -हे आपलं संवादाचं खुलं व्यासपीठ आहे. विविध विषयांवरच्या चर्चा, प्रश्नोत्तरं - गप्पांना आपण या ठिकाणी जागा ठेवली आहे.
३.६ चित्रदालन -यामधे पालकनीती परिवारातल्या प्रकल्पांचे, कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ बघायला मिळतील.
३.७ संदर्भ द्वैमासिक -‘शैक्षणिक संदर्भ’ द्वैमासिक हे पालकनीती परिवाराचे प्रकाशन आहे आणि त्याची निर्मिती संदर्भ सोसायटी या आपल्या मित्र संस्थेतर्फे केली जाते. द्वैमासिकाच्या संकेत स्थळावर जाण्याची सोय इथून केली आहे.
३.८ संपर्क -संपर्कासाठी पत्ता, प्रतिसाद नोंदवण्याची सोय आणि पालकनीती परिवारात सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणी केलं आहे.
ही झाली संकेतस्थळाची जुजबी माहिती यातल्या प्रत्येक विभागात वैशिष्ट्यपूर्ण सोयी-सुविधा आहेत. त्यातल्या खाचाखुणा आणि सविस्तर माहिती प्रत्येक महिन्याच्या अंकात आपण पाहूया. यात अडचण आल्यास, सूचना असल्यास आम्हाला 'palakneeti@gmail.com' वर कळवाव्यात आणि अर्थातच छान वाटल्यासही!
Happy Surfing !
प्राथमिक गटाचे वर्ग वस्तीमध्येच एका हॉलमध्ये आनंदसंकुलमध्ये असतात. तर मोठ्या मुलांसाठीचे खेळघर वस्तीपासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये असते. मोठी मुलं तिकडं काय करत असतील, ते वातावरण कसं असेल याचं कुतूहल वस्तीतल्या छोट्या मुलांना नेहमीच असते. यावर्षीची दिवाळी मोठ्या खेळघरात होणार या कल्पनेनंच छोटी मंडळी जाम खुश झाली होती. दिवाळी कशी साजरी करायची? आपण कधी जाणार? काय करणार? अशा प्रश्नांमधूनच मुलांची उत्सुकता जाणवत होती.
वस्तीतून चालत मोठ्या खेळघरात जाणं हीच त्यांच्यासाठी एक धमाल सहल ठरत असते. तिथली मोकळी जागा, ते गच्चीवरचं मुलांनी बांधलेलं मातीचं घर, तो खुणावणारा झोका अन् गच्चीतल्या बागेतून दिसणारं मोकळं आभाळ हे सर्व पाहायला अनुभवायला मुलांना आवडतं. पुढे कोणत्या ना कोणत्या कारणानं त्यांना तिथं जायचं असतं, खेळायचं असतं तसंच नवं काहीतरी शिकायचंही असतं.
प्रत्यक्ष दिवाळीच्या आधी २० ऑक्टोबरला, गुरुवारी छोट्यांची दिवाळी ठरली. दुपारी चारच्या सुमारास मुलं आपापल्या तायांसोबत यायला लागली. त्या दिवशी ती खूप सुंदर दिसत होती. केवळ ती नटली होती म्हणून नव्हे तर त्यांच्या आनंदी, प्रसन्न चेहर्याटमुळे ! खेळघरात मुलांचं स्वागत सुंदर रांगोळीनं आणि तायांच्या प्रेमळ हास्यानं झालं. तितक्यात दुसरीतला आनंद प्रश्नार्थक चेहर्यापनं म्हणाला, ‘‘ताई, आपण इथं, दिवाळी साजरी करणार...? इथं तर दिवाळी आहे असं वाटतच नाही.’’ त्याचा प्रश्न माझ्या लक्षात आला. खरं तर आम्ही मुद्दामच स्वच्छतेव्यतिरिक्त खेळघराची काहीही सजावट केली नव्हती. मी म्हटलं, ‘‘अरे, दिवाळी यायचीय अजून खेळघरात, आपण आणायचंय तिला आपल्यामध्ये,’’ तो गोंधळला. ‘‘कळेल तुला थोड्या वेळानं.’’
आम्ही सगळे एकत्र जमलो आणि मुलांच्या वय व समजेनुसार पाच गट केले. प्रत्येक गटात दोन ताई आणि प्रत्येकाला मनसोक्त आनंद लुटायला मिळावा यासाठी छोटे उपक्रम. फुलांच्या माळा करणं, कागदापासून आकाशदिवे करणं, पणत्या रंगवणं, कापून दिलेले आकाशकंदिलाचे आकार रंगवणं, पाना-फुलांची रांगोळी, कागदाच्या वेगवेगळ्या आकारांची तोरणं, चित्रं, फुगे फुगवणं, फळ्यावर चित्रं काढणं अशा उपक्रमांसोबत बॉल पासिंग, रस्सीखेच, बादलीत बॉल टाकणं, कानगोष्टी या मजेशीर खेळांची संगतही होतीच. गंमत म्हणजे एवढ्या जागेत सत्तर-ऐंशी मुलं आणि ताया असूनही कुठे गर्दी, गोंधळ जाणवला नाही. सहज त्या-त्या कोपर्याीतून जाताना जाणवत होतं की प्रत्येक मूल, ताई त्यात रमून गेली होती. कुणीतरी ताईला सांगत होतं, ‘‘हे मी केलं.’’ ताईही त्याचं कौतुक करत होती.
बघता-बघता प्रत्येक कोपर्यामध्ये तोरणं, आकाशकंदील, पणत्या, फुगे, साखळ्या, रांगोळ्या तयार झाल्या. इथं छोट्यांना मदत होती ती तायांची अन् मोठ्या मुलांची. त्यांच्या मदतीनं खेळघर नटू लागलं. हलके-हलके खेळघराचं रूप बदलू लागलं. खिडक्या-दारांत झेंडूच्या माळा डुलू लागल्या, भिंती, कपाटं मुलांच्या चित्रांनी सजली, फळे रंगले, पाना-फुलांच्या रांगोळ्यांनी जमीन जिवंत झाली, जागोजागी तोरणं, फुगे लागले. खेळघर आता खुलू-बोलू लागलं. तीच आधीची गंभीर जागा आता अगदी सुरेख - आनंदी, उत्साही अन् जिवंत दिसू लागली. त्या निर्जीव भिंतींमध्येही मुलांच्या प्रेमळ स्पर्शानं, किलबिलाटानं जान येत गेली. खेळघर पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालं. मी आनंदला म्हटलं, ‘‘आता वाटतंय का दिवाळी आहे असं?’’ तो हसून हो, हो करत त्याच्या हातातलं काम करायला निघून गेला.
प्रत्येकाच्या मनातला आनंद त्यांच्या निरागस चेहर्या वर जाणवत होता, नजरही विलक्षण बोलकी झाली, काहीतरी छान सांगण्यासाठी सगळीचजणं आसुसली होती.
आता समारंभाचा महत्त्वाचा भाग सुरू झाला. आम्ही सगळे एकत्र गोलात बसलो. आपण आज काय-काय केलं ते मुलं सांगत होती. मुलांनी त्यांना भावलेली गोष्ट आधी सांगितली. आज खेळघरातल्या सगळ्या ताया, काकू हजर होत्या. त्यांनीही त्यांना काय आवडलं ते सांगितलं. मुलांचा उत्साह पाहून तायाही आपसूकच चार्ज झाल्या होत्या. ताईनी सांगितलं ‘‘आपण सगळे एकत्र आलो, एकमेकांशी न भांडता, मिळून मिसळून एकत्र काम केलं, वस्तू बनवल्या अन् खेळघर सजवलं म्हणूनच तर आपल्याला एवढं छान वाटतं आहे. आपणच इथं आनंदाची अन् उत्साहाची निर्मिती केली. दिवाळीला आपल्याकडे घेऊन आलो.’’ मुलांना जाणवलं - फटाके, स्पीकरचा आवाज याशिवायची दिवाळी सुंदर असू शकते.
ह्या सुंदर वातावरणातल्या मनमोकळ्या गप्पांमुळे सगळेच खूप भारावले होते. सत्तर-ऐंशी जणांचं आमचं खेळघराचं कुटुंब दिवाळीच्या फराळाचा आनंद घेत होतं.
ही होती खेळघराची छोट्यांची दिवाळी. मोठ्या गटातील मुलांची दिवाळी एका वेगळ्याच संकल्पनेवर आधारित होती. त्याबद्दल वाचूया पुढल्या अंकात.