ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय आहे - खेळ !
खेळण्यात तनमनानं एकाग्र झालेलं लहान मूल अनेकदा आपल्याला विस्मित करतं. स्थळ-काळ-कारण-परिणाम या कशाचंही बंधन त्याला जाणवत नसतं. अत्यंत नैसर्गिकपणे, खेळातून मिळणार्या अनुभूतीतून मुलांच्या प्रज्ञेचा विकास होत असतो. शाळेत जाण्याच्या टप्प्यावर खेळातून शिकण्याच्या नैसर्गिक वाटेवरून आपणही सोबत चालणं आणि मुलांचं शिक्षण पूर्णपणे आपल्या हातात न घेणं हे मोठ्यांसमोर आव्हान असतं.
आज अनेक मुलांना शिकण्यातली ही मोठ्यांची सहृदय साथ तर सोडाच पण बालवयात मुक्त खेळण्याचा हक्कही मिळत नाहीये. ही केवळ संधिवंचितांची परिस्थिती नव्हे तर अतिजागरूक पालकही हा हक्क हिरावून घेत आहेत. याखेरीज आजच्या काळानं समोर ठेवलेलं खेळांचं बाजारीकरण, संगणकावरच्या भ्रामक, न - वास्तव खेळांचं वाढत जाणारं लोण हेही आव्हान आहेच.
जगण्याचा वेग, स्पर्धा नि त्यातून येणार्या - स्वकेंद्रीपणाचा परिणाम आज आपली मुलं आणि आपण अनुभवतो आहोत. या रेट्यामधे हरवलेला मुक्त खेळण्याचा, त्यातून शिकण्याचा मुलांचा अवकाश त्यांच्या खर्यारखुर्याल विकासासाठी आपण मोकळा ठेवायला हवा.